Monday, 12 February 2018

*दो घडी वो जो पास आ  बैठे...*
 "चार दिवस आधी राहायला येशील ना ग?"
माझ्या जवळ  जवळ बाराव्यांदा विचारल्या गेल्या प्रश्नाला  "होय" असे दोन बहिणींकडून ठाम उत्तर  मिळाले ,मग माझा जीव भांड्यात पडला.हि भांड्यात पडण्याची आयडिया कुणाची कुणास ठाऊक? आम्ही आपले सासूबाईंची भांडी जीव  पडायला वापरतो..एरवी घरात टपरवेअर. ..
असो ...एकूणच काय माझा जीव नाॅनस्टीक पातेल्यात  पडला.
 दोघी आल्या आणि घराचे लग्न घर झाले.खरंतर contract system मधे करायला काही नव्हते पण मुंजीचे भिक्षावळीचे लाडू बहिणीने हाताने रेखले.सासूबाईंची शाबासकी मिळवली.(हे दुसरे अशक्य काम चोख पूर्ण )
धाकटी बाहेरच्या कामात expert.तिने तट शेवटच्या दिवसापर्यन्त लढवला.किरकोळ खरेदी,शिंपी ,बांगड्या सगळं आटपलं.
     मग मांडवात नेण्याचे आहेर ,बॅगा भरता भरता तिघींच्या गप्पांच्या मैफिली झाल्या..फार रेंगाळले कि मग कुणीतरी  भानावर येऊन "चला चला ,उठा...ताट घ्या...भूक लागलीय म्हणून जागे करु लागले"
दोन दिवस आधी बाकीच्या भावंडानी हजेरी लावली.फोटो,मेंदी, गाण्याच्या भेंड्या ह्यांनी घर भारलं.
    बघता बघता चार दिवस पार पडले ,कार्य उरकलं.दुस-या दिवशी बहिण निघणार म्हणाली तेव्हा जाणवलं,सुट्टी  संपली अन आता शाळा सुरु होणार रुटीनची. .
" तू आलीस खूप आधार वाटला..कार्य निभावलं",मी म्हणाले.
दोघींनाही गलबलून आलं...आता शेवटची संध्याकाळ अन गप्पा भैरवी बनल्या .काही आर्त तारा छेडल्या..काही  नवे आलाप जोडले..एकदा गळ्यात पडून स्फुंदत रडून  घेतलं.. भाते रिकामे झाले वाटेपर्यंत.
  आज धाकटी निघाली...पुन्हा आर्त मैफल जमेल..काहूर उठेल...हक्काने केलेला वाद,चेष्टा,तक्रारी संथ झाल्यात.हातातली बाहुली कुणीतरी मी बाहुलीशी गप्पा मारता मारता हिसकावून  घ्यावी आणि उंच फळीवर ठेवावी..तसं काहीसं..
ह्या भेटींना whatsapp नि fb काय भरुन काढणार ?
पण बहिणी पुन्हा  येतील सुट्टीला...सोबत माझं आणि त्यांच बालपण परत घेऊन...वर्षभर जीर्ण  झालेली कात काढून टाकायला.
       असं भरपूर बहिणभावंडानी समृध्द असावं..मनातलं सार बोलायला...भरपूर भांडायला...जगापासून लपवलेले सारे कोष फोडून पुन्हा फुलपाखरू व्हायला..
     अंहकाराच्या पलिकडे जाऊन जिवंत  राहावी हि चुलतमावस नाती...
"दो घडी वो जो पास आ बैठे
हम जमाने से दूर जा बैठे"
Unknown Author 🙏​​

No comments:

Post a Comment