Sunday 1 April 2018


परवा मित्राकडे असला विजोड साबण बघितला, अन् टचकन डोळ्यात पाणी आले.
एकदम् आई आठवली!
साबण विरत आला, हातात येईनासा झाला की आई नवा साबण काढायची, जुन्या विरलेल्या साबणाचा तुकडा त्याला चिटकवायची.
मला नाही आवडायचे.
'हा काय किडेखाऊपणा?' मी चिडायचो, 'फेकून दे ना तो तुकडा. नव्या साबणाची मजाच जाते!'
आमची घरची आर्थिक परिस्थिती छानच होती, हे असले प्रकार करायची काही एक गरज नसायची.
पण आई ऐकायची नाही!
'कमवता झालास कि कळेल तुला एका एका पैशाची किंमत! कमवता होत नाहीस तोपर्यंत वाचवायला शिक!'
मला पटायचे नाही.
शाळेत होतो, बंडखोरी नुकतीच शिकत होतो!
'हा असला साबण मी वापरणार नाही, मला नवाच साबण पाहिजे!' असा इशारा द्यायचो पण काही एक ऊपयोग व्हायचा नाही. वर्षानुवर्षे असाच दुरंगी साबण वापरावा लागला.
वर्षांपुर्वी आई गेली.
जेव्हा होती तेव्हा बऱ्याच वेळा तिच्या छोट्या छोट्या गोष्टींचे मोल केले नाही, आणि आता गेली आहे, तर तिच्या सगळ्याच गोष्टी अमोल वाटताहेत!
बाथरूममधुन बाहेर आलो, डोळे लाल झाले होते.
मित्राने विचारले,
'काय रे, डोळ्यात साबण गेला का?'
'नाही रें, साबणामागची आई!'

No comments:

Post a Comment