Monday 9 April 2018

स्पर्शतृष्णा
मी कधीही माहेरी गेले की माझी पंच्याऐंशी वयाची आई माझ्या अवती भवती घुटमळत असते. आधी माझ्या गालांवरून हात फिरवून घेते, नंतर माझ्या ओढणीचं टोक तरी चाचपते. मी आपली तिचं कुशल विचारून भाचेकंपनीचे लाड करण्यात, भावावहिनीची चेष्टा मस्करी करण्यात मग्न असते.
आई तिथेच कौतुकाने मला न्याहाळत असते. माझ्या नव्या बांगडीला हात लावून बघते.
सुरूवातीला मला तिचं या वागण्याचा अर्थं कळायचा नाही.
पण हळू हळू तिच्या नजरेतली स्पर्शाची तहान मला स्पष्ट होत गेली.
स्पर्श जेव्हा दुर्लभ होतो तेव्हाच त्याचं महत्त्व कळतं.माझ्या वयाची सहा दशके ओलांडल्यानंतर मी जेव्हा स्वत:कडे बघते तेव्हा स्पर्शांची अनेक वाटावळणे शराराने पार केलेली दिसतात.
लहानपणात आईबाबांच्या स्पर्शसान्निध्यातच ऊबदार सुरक्षित वाटायचं. भावंडांचे लडिवाळ तर कधी हाणामारीचे स्पर्शही हक्काची विरासत होती.आजीच्या गोधडीतच नव्हे.,पार तिच्या सुरकुतल्या मऊ मऊ पोटात शिरून गोष्टी ऐकण्यात लाड होते.आत्या,काका यांनी धपाटे घातले तरी त्या स्पर्शातही माया होती. चांगलं काही केलं की त्यांनी पाठीवर फिरवलेला हात बक्षीस वाटायचा. मैत्रिणींशी तर गळ्यात हात टाकल्याशिवाय बोलता येतं यावर विश्वासच नव्हता.
वयात आल्यावर काही स्पर्श टाळण्याचे संकेत मनाने आपोआप दिले.काहींच्या बाबतीत घरच्यांचा खडा पहारा असायचा.पण एकंदरीने तेव्हा बाबा,वडीलधारी पुरूष मंडळी यांनी आपणहूनच आम्हा मुलींना करायच्या स्पर्शावर रेशन आणलं होतं.
मुंबईसारख्या शहरात लोकलच्या, बसच्या गर्दीत काही नकोनकोसे स्पर्श सहन करावे लागायचे तेव्हा जीवाचा चोळामोळा व्हायचा.बाबांच्
या वयाचा एखादा सभ्य दिसणारा गृहस्थ शेजारची सीट मिळताच गर्दीचा फायदा घेऊन स्पर्शाचे ओंगळ शिंतोडे उडवायचा तेव्हा माणुसकीवरची श्रद्धाच उडायची.
लग्न ठरल्यावर आणि झाल्यावर तर स्पर्शाच्या आनंदाला फक्त उधाणच माहीत होतं.जोडीदाराच्या आश्वासक, प्रेमळ,प्रणयी, सहज, अशा सा-या चवी ओळखीच्या झाल्या.हव्याहव्याशा झाल्या.
मी आई झाल्यावर त्या नवजात रेशीमस्पर्शांनी नवा अर्थ आणून मला श्रीमंत केलं. मुलांचं सतत अंगाशी येणं, भूक भूक करीत हाताशी झोंबणं, लडिवाळपणे कमरेला विळखा घालणं,रात्री त्यांनी कुशीत झोपणं हे स्पर्श तेव्हा सवयीचे झाले. कधी कधी 'बाजुला व्हा रे,किती अंगचटीला येता?जरा मोकळी राहू द्या ना मला ! '' असंही मी ओरडले त्यांच्यावर.
गंमत म्हणजे हेच मुलगे काॅलेजात जायला लागल्यावर,मिसरूड फुटल्यावर अंतर राखायला लागले. थोरला शिक्षणासाठी लांब होता.तो घरी आला की मला भरतं यायचं.मी त्याला कुशीत ओढायची. पापा घेऊ बघायची तर तो चक्क अंग चोरायचा. हंहं बास बास असं काही बोलून सुटका करून घ्यायचा.
मी हिरमुसायची. पण नंतर या प्रकारच्या दुराव्याची मनाला सवय लागली.
या उलट मुलगी असेल तर आपणहून बिलगते,गळामिठी घालते अशावेळा स्वत:ला मुलगी नसण्याची खंत उफाळून येते. कोणी कितीही समजावलं की सुना या मुलीसारख्या असतात वगैरे तरी मला ते मुळीच पटत नाही. सुना अदबीने वागतील,मोकळेपणे बोलतील,जीव लावतील पण अहो आईंना आपणहून बिलगणार नाहीत.त्यांच्या आईच्या गळ्यात जेव्हा त्या हात टाकतात तेव्हा मी माझ्या विहीणीवर चक्क जेलस होते. म्हणजे मी हून सुनांना जवळ घेतलं तर त्या मुलग्यांसारखं अंग चोरीत नाहीत,मला त्यांचे लाड करू देतात पण.... जाणवतंच काहीतरी..आतल्या आत...!
माझ्या बरोबरीच्या एका मैत्रिणीचा नवरा चार पाच वर्षांपूर्वी गेला. ती वरवर सावरलेली वगैरे. ब-याच दिवसांनी मी तिच्या घरी गेले होते. झोपताना गप्पा मारता मारता मी सहज तिच्या अंगावर हात टाकला तर तिचे डोळे भरून आले एकदम. माझा हात गच्च पकडत ती म्हणाली,''किती दिवसांनी असा कोणाचा स्पर्श मिळतो आहे गं! ''
तिच्या त्या व्याकुळ उद् गारात अर्थांचे डोंगर सामावले होते.मुला सुना नातवंडांच्या भरल्या घरात ती घासाला महाग नव्हती,पण स्पर्शाला मोताद होती.आपली कासाविशी मला कदाचित् हास्यास्पद वाटेल या भीतीने असेल तिने विषय बदलला पण माझ्या डोळ्यात चर्र दिशी अंजन गेलं.
मला माझ्या आईच्या स्पर्शाचा अर्थ लागला. माझ्या बाबांच्या निधनानंतर आईच्या भोवती नात्यांचा महासागर असूनही ती कोरडी होती. माझे भाऊ,वहिनी कर्तव्यात कमी पडत नाहीत पण साध्या स्पर्शाची तिची तहान कोणाला कळणारी नाही. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा साठीची झूल हटवून मी आईकडे पाहिलं, मी अजून भाग्यवंत आहे,मला आई आहे याचा साक्षात्कार झाला.
आता मी कधीही आईला भेटले की उमाळ्याने आईला मिठीत घेते.तिची जराजर्जर काया समाधानाने माझ्या हातात विसावते.
आईला भेटायला जाताना तिला काय भेट न्यावी हा प्रश्न पूर्वी पडायचा.आता नाही. मीच मला नेते.
एकेका लेखाचे भागधेय विलक्षण असते.
मी परवा रात्री फेसबुकवर स्पर्शतृष्णा लेख नेहमी प्रमाणेच माझ्या मित्रमैत्रिणींच्या वाचनार्थ पोस्ट केला.
सकाळी माझ्या अमेय आणि सुयोग दोन्ही मुलांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया(ज्य
ा माझ्यासाठी अनमोल आहेत.) आल्या आणि भरून पावले.
माझ्या नेहमीच्या मैत्रिणी,मित्र यांनीही भरभरून दाद दिली.हे सगळं खरंतर नेहमीप्रमाणेच झालं. मलाही त्यात माझ्या भावना मोकळ्या झाल्याने हलकं वाटलं होतं इतकंच.
पण इतकंच होणार नव्हतं.या पलिकडेही या लेखाने अजून काही अनुभव दिले.
काल दिवसभरात हा लेख फार वेगाने पसरला. अक्षरश: व्हाॅटसपवर ऐंशी नवीन लोकांचे माझा नंबर मुद्दाम मिळवून भरभरून अभिप्राय आले. मी थक्क झाले,सुखावले आणि तरी मनाचा एक कोपरा गलबलत राहिला.
अनेकांना आपल्या वृद्ध पालकांच्या तृषार्त नजरेचा अर्थ हा लेख वाचून समजला होता.एका गृहस्थाने आपल्या आईला हा लेख वाचून स्वत:ला अंघोळ घालायला सांगितली. त्याने लिहिलं की,माझ्या आईचा स्पर्श मला किती वर्षांनी होत होता. त्याच्या आईच्या चेह-यावर त्याने सुंदर हसू पाहिलं.
कोणाला दूर असलेला भाऊ आठवला,कोणाला लाड करणारा मामा आठवला.
कोणी आपल्या वडिलांचा सुरकुतला हात गालावरून फिरवून घेतला.
जवळजवळ प्रत्येकाने आपले स्पर्शाचे भांडार खुले केले.
यात कोणी जुन्या ओळखीचे निघाले,कोणी नवीन ओळखीचे झाले.
विशेष म्हणजे स्त्रियांपेक्षा हे कळवणा-या पुरूषांची संख्या जास्त होती.
हे ही समजू शकते एकवेळ. मी ही अनेकदा लेखकाला लेख आवडल्यावर काळजातून दाद दिलेली आहे. पण... अजून...
आज सकाळी पावणेआठचा सुमार.
बेल वाजली म्हणून दार उघडलं.तर एक तिशीच्या आसपासची स्त्री दारात उभी. चेहरा दमलाघामेजलेला. श्वास फुललेला.
''तुम्ही वैशाली पंडित का?'' तिने विचारलं.
''हो. आपण? या ना.. '' मी.
यावर एक नाही दोन नाही बाई माझ्या गळ्यात पडून धो धो रडायला लागली. मी गडबडले. बापरे,आता काय करू हिचं ?
''प्लीज शांत व्हा. मला समजत नाही काय चाललंय? कोण आहात तुम्ही? ''
नुसते हुंदके. मी पाणी आणायलाही जाऊ शकत नव्हते इतकी गच्च गळ्याशी मिठी. मी सटपटलेच. काय काय आठवलं.एकटीदुकटी बघून झालेल्या दुर्घटना,हत्या. मेलेच म्हटलं बहुतेक. पण बाई सभ्य वाटत होती. चेहरा माझ्या मानेत घुसवलेला. काय कोणाचं सांगावं तरी ! कल्प विकल्प येऊन गेलेत मनात.
शेवटी आवाज चढवला.
''बाई गं,माझे आई,बोल काहीतरी. मी भीतीनेच मरीन इथे.कोण तू? का रडतेस?''
आता आपण काहीतरी विचित्र वागलो याचं भान मॅडमला आलं बहुतेक. माझ्यापासून दूर झाली. मी दाखवल्या खुर्चीवर बसली. पर्समधनं नॅपकीन काढून नाकडोळे पुसले.
'' मी विनया राणे. माहेरची साखळकर. मी लांज्याहून आलेय. हायस्कूल टीचर आहे. मॅडम, मला माझ्या बहिणीने बेंगलोरहून तुमचा स्पर्शतृष्णा लेख पाठवला. मी दु:खाने वेडी झाले,मी माझ्या आईची शतश: गुन्हेगार आहे. ती खूप महिने अंथरूणावर होती. तिला बेडसोअर्स झालेले. आम्ही भावंडं तिला औषधे द्यायचो,नर्सपण ठेवलेली. पण तिच्या अंगाला येणा-या दुर्गंधीने आम्ही तिच्या जवळ थांबत नव्हतो.तिला स्पर्शपण नव्हतो करीत. नाकाला रूमाल लावून तिला हवं नको विचारायचो. तिच्या डोळ्यात नैहमी वेदना दिसायची.सतत पाणी वहायचं.हिला आम्ही सगळं काही देऊनच्या देऊनही हिची रड.असंपण आम्ही बडबडायचो.एकदाच मला आणि ताईला ती म्हणालेली,या गं जवळ बसा.मला जवळ घेऊ दे तुम्हाला. पण आम्ही अंग झाडून तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर आई गप्पच झाली. डोळेपण उघडीना. आता ती जाणार असं डाॅक्टरांनी पण सांगितलं.तिची सुटका होईल असंच सगळे म्हणत होते.शेवटी दोन दिवसांनी ती गेलीच. या गोष्टीला सहा वर्ष झाली. तुमच्या लेखाने मला मी किती नालायक मुलगी आहे असं वाटलं. माझी आई आमच्या स्पर्शासाठी आसुसली होती आम्हाला ती शेवटचं कुरवाळू पहात होती आणि आम्हाला तिची फक्त घाण वाटत होती. आम्ही पण आया झालोत पण तिची भावना नाही ओळखू शकलो. तिचा राग राग कैला, ती कधी जाईल असं म्हणत राहिलो.भयंकर शरम वाटली मला माझी. मी आज तुम्हाला नाही, तुमच्या साक्षीने माझ्या आईला मिठी मारली. ''
अश्रूच्या महापूरातून ती ओसंडत बोलत होती. साॅरी गं आई,माफ कर गं मला म्हणत मला कवळत होती.
मी सुन्न.
थोड्या वेळाने ती सावरली.
जायला पाहिजे घरी. फक्त नव-यालाच माहीतीय मी आलेले. त्यांनीच पहाटे लांज्यातून येणा-या गोवागाडीत बसवून दिलंय. निघते.
माझा हात हातात घेतला.
मी मलाच आणलंय तुमच्यासाठी. तुमच्या लेखात आहे तसं.
ती थोड्याच वेळासाठी आली होती. मी माझा गृहिणीधर्म कसा निभावला,काय बोलले नाही आठवत.
इतकंच की ती निघून गेल्यावरही मी जागची हलू शकत नव्हते. तिचा नंबर घेण्याचं भानही उरलं नाही,एवढी जागेवर खिळले होते.
माझ्या लेखाने माझ्या झोळीत जे जे टाकलं त्याची मोजदाद करायला जन्म पुरणार नाही.खरंच कुठे ठेव तरी मी हे संचित ?

No comments:

Post a Comment