Friday 6 April 2018

सवेंदनशीलता
आज खूप दिवसांनी लिहावसं वाटलं ते वॉट्स अप वर ऑनलाईन असताना. जगाच्या पाठीवर कुठेही असलेले आपले मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक हे पुन्हा संपर्कात येतात आणि अगदी जवळच आहेत असं वाटतात. हे इतके लांब असलेले आपले जिवलग 'जस्ट वन क्लिक अवे' असतात. खूप छान वाटत की एकेकाळी एकत्र खेळत असलेले आपले मित्रमैत्रिणी किंवा भांवंड आता खूप काहीतरी उच्च शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात उंच भराऱ्या मारत असतात. जेंव्हा असा जुना जिवलगांचा ग्रुप फॉर्म होतो तेंव्हा रोजच्या काहीतरी गप्पा चालू होतात. कोण कोण काय काय करतंय, कुठे आहे, सगळं शेअर होतं अगदी पूर्वीसारखं. थोडे दिवस हे सगळं खूप छान चालू असतं मग बोलायचे विषय संपतात आणि चालू होतो फॉरवर्ड चा सिलसिला. मग त्यात वेगळे वेगळे लेख, शुभेच्छा, जोक्स चालू होतात.
वॉट्स ऍप वरच्या जोक्स चे विषय हे तर ठरलेलेच. ते म्हणजे अनुक्रमे बायको, पुणे, गुरुजी, राजकीय नेते. खरंतर ह्यातील कोणताही विषय विनोदाचा आहे असं मी तरी मानत नाही. त्याचं कारण मी पुण्याची आहे किंवा कोणाची तरी बायको आहे हे नक्कीच नाही. (स्वतःवर केलेले विनोद पचवण्याची विनोदबुद्धी माझ्यात नक्कीच आहे.) पण विनोदाला एक दर्जा असावा ह्या मताची मी आहे.
बायको वरचे जोक्स हे जेंव्हा तिच्या मृत्यू पर्यंत गेले तेंव्हा मात्र ते खरंच डोक्यात गेले. प्रश्न मी एक बायको आहे म्हणून नाही तर आपली असंवेदनशीलता इतक्या खालच्या थराला पोहोचलेली आहे की आपण एखाद्याच्या मृत्यूवर जोक करतो? लहानपणापासून घरातली गृहिणी ही घराचा एक भक्कम आधार असते हे ऐकत बघत आलोय. आपली आई आपलं अख्ख घर स्वतःचा स्व विसरून सांभाळत असते हे बघितलंय आणि तिचा आदर मात्र फक्त वूमनस डे किंवा मदर्स डे पुरता? आणि हे दिवस संपले की उरलेलं वर्ष तिच्यावरचे जोक्स? सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या फॉरवर्ड करणाऱ्या लोकांमध्ये फक्त तरुण वर्ग नाही तर वयस्क लोकं पण आहेत आणि खुद्द बायका पण आहेत. खरंतर ह्याच पिढीनी आम्हाला आदर करायला शिकवलाय तो आई वडिलांचा, गुरुजनांचा, नेत्यांचा. मग इथे तुमची शिकवण कुठे जाते. इथे मला एक प्रश्न पडतोय की वॉट्स ऍप वर मेसेजेस टाकणे हे तुमच्या ऍक्टिव्ह असण्याचे किंवा काळाप्रमाणे चालण्याचे लक्षण का समजलं जातंय? एखादी पोस्ट मला आलीये ती मला पटो न पटो मी ती दुसऱ्या ग्रुप वर फॉरवर्ड करणार ही एक सवय झालीये. एकदा एका बाईनीच मला सांगितलं, "इतकं सिरिअसली घेऊ नकोस ग". आमच्या पिढीच्या संस्कारक्षम वयात हे प्रकार नव्हते म्हणून ठीक. पण आत्ताच्या मुलांच्या संस्कारक्षम वयात आपण त्यांना हे वाचायला देतोय. ह्याचा कुठे ना कुठे त्यांच्या मनावर परिणाम होतो हे नक्की.
माझी बायको बस चुकल्यामुळे वाचली म्हणून नवरा रडतोय, बायकोच्या मोबाईल मध्ये ब्लु व्हेल डाउनलोड केल्यावर ब्लु व्हेल मेला, नागीण विष मिळवण्यासाठी बायको कडे येते. ही असली वाक्यं आपल्याला जोक्स चा आनंद देतात? आणि जर खरंच देत असतील तर ही गंभीर बाब आहे. आपण हीच शिकवण पुढच्या पिढी ला कळत नकळत देतोय. कारण आज वॉट्स ऍप हे किशोरवयीन मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सगळेच वापरत आहेत. आणि मग हल्ली लग्न टिकत नाहीत म्हणून पुढच्या पिढीला दोष देणारे पण आपणच. लहानपणापासून 'सुसंगती सदा घडो' हे ऐकत आलेले आपण मुलांना मात्र सदैव एखाद्या नात्याची, गावाची किंवा पदाची काळी बाजूच दाखवून मोठं करतोय.
दुसरा जोक्स करायचा आवडता विषय म्हणजे 'पुणे'. पक्की पुणेरी असल्याने आणि त्याचा जाज्वल्य अभिमान असल्याने हे जोक्स सहन करणे खरंच कठीण आहे माझ्यासाठी. (पुन्हा विनोदबुद्धीची कमतरता म्हणून न्हवे तर त्या जोक्स च्या दर्जा खूप हीन आहे म्हणून.) प्रत्येक गावाची एक आपली जीवनशैली आहे. ती त्याच्या भॊगोलिक किंवा ऐतिहासिक कारणांमुळे तयार झाली असते. पुणेरी पाट्या बघितल्या तेंव्हा खूप मजा वाटली सुरुवातीला आणि आपल्या लोकांच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक पण वाटले. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' ह्याप्रमाणे त्याच्या छटा बघताना खरंच मनोरंजन होतं. पण मन हललं ते काही विशिष्ट पाट्यांनी.
'तेराव्याची जेवणाची ऑर्डर स्वीकारू पण पंधरा दिवस आधी बुकिंग करावे' एका तरी माणसांनी ही पाटी मला पुण्यात शोधून दाखवावी. 'एका वयस्क आजोबांना आधार कार्ड थोडक्यासाठी कशाला काढताय हे पुण्यात उत्तर मिळतं.' 'औषधांची एक्सपायरी डेट माहित आहे पण तुमची नाही. तरी उधार मागू नये' इतके हीन दर्जाचे जोक्स बघितले की खऱ्या पुणेकराला राग आल्याशिवाय राहणारच नाही. मुख्य म्हणजे पुण्यात बरेच वर्ष राहणारी लोकं हे असले जोक्स फॉरवर्ड करतात आणि वर परत म्हणतात की आम्ही मूळचे पुण्याचे नाही. ज्या शहरांनी त्यांना डिग्री, नोकरी, छत्र दिलं त्या शहराला तुम्ही सोयीस्कर रित्या आपलं आणि परकं करता. इतके कृतघ्न लोकं महाराष्ट्रातल्या कोणत्या शहराचे? असा प्रश्न केल्यावर स्वतःच्या शहराचे नाव न सांगता आता पुण्याचेच आहोत असं सांगतील. पण जेंव्हा त्याच पुण्यावर जोक्स होतील तेंव्हा हे सगळे पुन्हा आपापल्या गावात पोहोचतील. "आपलं मत स्पष्टपणे मांडायला आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामांना सामोरे जायला हिम्मत लागते. ती एका फक्त स्पष्टवक्त्या पुणेकरताच आहे" असं वक्तव्य मी केल्यास ते चुकीचा ठरू नये. असो ह्याबाबत लिहिण्यासारखे खूप काही आहे. पण ही पोस्ट पुण्यासाठी नाही तर संवेदनशीलते बद्दल आहे. इथे पुन्हा तेच होतंय.
तिसरा विषय तर जोक्स साठी कसा असू शकतो हेच मला कळत नाही. आजही रस्त्यात शाळेतले कोणतेही शिक्षक दिसले तर पटकन पाया पडणारे आम्ही त्यांच्या मागे सरळ सरळ त्यांच्यावर वाट्टेल ते जोक्स पाठवतो. (मात्र गुरु पौर्णिमा आणि टीचर्स डे सोडून हं! त्या दिवशी आमचा आदर खूपच उफाळून येतो.) त्यात सुद्धा काय तर 'गुरुजी पळाले', गुरुजी तुम्ही चड्डी का काढताय', गुरुजींनी शाळा सोडली', 'गुरुजी वारले' शी! आपली पातळी किती खालावतोय आपणच. पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं की हे जोक्स पाठवणारे सुद्धा सगळ्या पिढ्यांमध्ये सापडतील. ज्या पिढीने खरंतर गुरुजनांचा बरोबरीने आम्हाला घडवलं ते सुद्धा असे जोक्स पाठवतात.
हे सगळं लिहिण्याचं कारण की आपल्यातली संवेदनशीलता संपलीये की सदसद्विवेकबुद्धी? हा प्रश्न मला पडतोय. एखादा जोक आला की त्यावर काहीच विचार न करता आपण कसा काय फॉरवर्ड करू शकतो. किंवा मग 'इधर का माल उधर' करण्याच्या शर्यतीत ही आपण भाग घेतोय. पुन्हा काही बोललं की 'व्यक्ती स्वातंत्र्य' नावाची ढाल पुढे करता येतेच की! (विशेष सूचना: ही ढाल फक्त जोक पाठवणारे वापरू शकतील. ते न आवडल्यास प्रतिक्रिया देणाऱ्यांना व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार नाही.)
मी सुरवातीलाच लिहिल्याप्रमाणे खरंच खूप काही सुंदर अनुभव किंवा लिखाण शेअर करण्यासाठी आपण वॉट्स ऍप किंवा फेसबुक चा उपयोग करू शकतो. पण जेंव्हा त्याच्या आहारी जाऊन लोकं ' जस्ट फॉर द सेक ऑफ मेसेजिंग' काहीही फॉरवर्ड करतात तेंव्हा खूप वाईट वाटतं आणि काळजीही वाटते. स्मार्ट फोन आणि इंटरनेट चा सुळसुळाट होण्याच्या आधी खरंच खूप सोपा होतं आयुष्य. इंटरनेट च्या फायद्याबरोबर 'सोशल प्रेशर' नावाचा बागुलबुवा आला आणि आपल्याच पुढच्या पिढ्यांची वाट लावायला निघाला. (वॉट्स ऍप आणि फेसबुक वर असणे हे सुद्धा सोशल प्रेशर आहे अलीकडे).
आपल्या पुढच्या पिढ्यांची काळजी आपल्यालाच करायची आहे आणि त्यांच्या समोर आपणच आदर्श उभा करायचाय. तेंव्हा 'आदर' ही भावना जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर कृपया असे कोणतेही जोक्स फॉरवर्ड करताना एकदा पुन्हा विचार करा ही नम्र विनंती.

No comments:

Post a Comment